Wednesday, May 13, 2020

साधनाची जरूर काय?


साधनाने साधत नाही हे कळायला साधन करायचं! ~ श्रीमहाराज

Monday, April 20, 2020

चिंतन केंद्र


चिंतने चिंतने तद्रूपता - चिंतन विषय तपासणे आणि भटकणाऱ्या चित्ताला केंद्राकडे वरचेवर घेऊन येणे हेच सर्व साधनाचे सार आहे!

Sunday, April 19, 2020

ऐहिक मूल्ये मनःकल्पित!!

ऐहिक जीवनमूल्ये वस्तुतः मनःकल्पित असतात. त्यांना सत्याचा पाया नसतो. हे विचार साधकाला निश्चित उपयुक्त आहेत. परमार्थ हेच शिकवतो. देवाशिवाय कशालाही जीवनमूल्य म्हणता येणार नाही. या मुख्य जीवनमूल्याच्या प्राप्तीला इतर गोष्टींचा ज्याप्रमाणात उपयोग होतो, तितकेच त्यांना महत्त्व, अधिक नाही. अधिक महत्त्व आपण अस्मितेमुळे देतो. ते देऊ नये, हेच विवेकाचे सांगणे आहे.

असत्य जीवनमूल्यांना महत्त्व देण्याच्या मुळाशी भीती - एकाकीपणाची, आंतरिक पोकळीची - भीती आहे. काही कारणाने मन अस्वस्थ झाले - मित्र चांगला न वागल्याने, कोणी निंदा केल्याने, कार्यात यश न आल्याने - तर आत्मनिरीक्षण केल्यास वरील सत्यता पटते. त्यावेळेपुरते "या गोष्टीमुळे सर्वनाश झाला" अशी वृत्ती भ्रमाने निर्माण होते. काही वेळाने पुनः सर्व पूर्ववत होते. कारण ती वृत्ती भ्रमच असते. तितका काळ मात्र व्यर्थ जातो, दुःख होते. त्याबरोबरच अशा प्रत्येक अनुभवाने तो भ्रम बळावतो;

म्हणून सतत आत्मनिरीक्षण करून, स्वतःची अस्मिताच काढून टाकावी. त्याचे मुख्य साधन नामस्मरण व स्वरूपानुसंधान; त्यावाचून आत्मदर्शन नाही; देहतादात्म्याचा नाश नाही!

~ पूज्य काकासाहेब तुळपुळे (डोळस नामसाधन)

परमार्थ देवाच्या इच्छेने वाढत असतो!!!

"परमार्थाचे परम महत्त्व जाणून उत्कटतेने साधन करणारे साधक आहेत तोपर्यंतच पारमार्थिक उत्साह टिकणे शक्य आहे. म्हणून स्वतःसाठी व (नाम) संप्रदायाच्या प्रेमासाठीही दीर्घकाल, निरंतर, सत्कारयुक्त नामस्मरण करणे हेच प्रत्येक गुरुपुत्राचे कार्य आहे" असे गुरुदेव (रानडे) सुचवीत.

"आपल्यामागे परमार्थ कोण चालवील?" या त्यांना प्रत्यक्ष न विचारलेल्या पण प्रत्येकाच्या अंतरी असलेल्या प्रश्नाला ते महाराजांची एक गोष्ट सांगून उत्तर देत --

श्री अंबुराव महाराज (पू भाऊसाहेब उमदीकर) महाराजांना म्हणाले, "आपण आणखी काही दिवस राहा, नाहीतर परमार्थ कोण चालवील?" महाराजांनी उत्तर दिले, "तुला परमार्थ वाढावा ही उत्कंठा असेल तर खोली बंद करून नामस्मरण करीत बैस, परमार्थ देवाच्या इच्छेने वाढत असतो!!!"

~ पू काकासाहेब तुळपुळे लिखित डोळस नाम साधन या पुस्तकातून 

Saturday, April 18, 2020

ओळख!


आणि जो त्या 'मी' च्या जागी 'गुरूंना' घालतो, त्याचा प्रपंचच परमार्थ होतो!